ग्रंथालयाबाबत संक्षिप्त माहिती महाराष्ट्र विधानमंडळाच्या ग्रंथालयाची स्थापना दिनांक १८ मार्च, १९२२ रोजी झाली. सन १९१९ च्या कायद्याप्रमाणे सन १९२१ मध्ये त्यावेळच्या मुंबई प्रांताचे पहिले लोकनियुक्त कायदेमंडळ अस्तित्वात आले व विधानमंडळ सदस्यांच्या माहितीसंबंधीच्या अनेकविध गरजा भागविण्यासाठी तसेच वेगवेगळे कायदे करताना आवश्यक ते सर्व संदर्भसाहित्य, माहिती उपलब्ध करून देण्यासाठी या ग्रंथालयाची स्थापना इ आली.
महाराष्ट्र विधानमंडळ सचिवालयाचे ग्रंथालय हे समृध्द व सुसज्ज असून ते पूर्णत: वातानुकूलित आहे. नवीन विधानभवनाच्या इमारतीमध्ये ५ व्या व ६ व्या मजल्यावर ते व्यवस्थापित करण्यात आलेले आहे. महाराष्ट्रातील हे एक महत्त्वाचे व विशेष स्वरूपाचे संदर्भ ग्रंथालय असून प्रामुख्याने केवळ विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांसाठी आहे. मात्र, विशेष अभ्यासक, संशोधक, वृत्तपत्रांचे प्रतिनिधी यांना संदर्भसेवा व अन्य प्रकारच्या ग्रंथालयामध्ये उपलब्ध होऊ न शकणारी आणि केवळ विधिमंडळामधूनच मिळू शकणारी अशा स्वरूपाची माहिती मागणीनुसार अन्य कोणालाही या ग्रंथालयामधून दिली जाते. विधानमंडळाच्या सन्माननीय सदस्यांना लागणारी पुस्तके, दोन्ही सभागृहांच्या मागील कामकाजाची कार्यवाहीवृत्ते, शासकीय अहवाल, वृत्तपत्रांतील विविध विषयांवरील महत्त्वाच्या बातम्या व लेखांची कात्रणे तसेच, नियतकालिकांतील लेख इत्यादी माहिती सन्माननीय सदस्यांच्या मागणीनुसार त्यांना उपलब्ध करुन देऊन त्यांची संसदीय कर्तव्ये व जबाबदाऱ्या परिणामकारकरित्या व समाधानकारकपणे पार पाडण्यास त्यांना सहाय्य करणे हा या ग्रंथालय सेवेच्या व्यवस्थेमागील प्रमुख उद्देश आहे.