उपसभापती : सन्माननीय सदस्य श्री. मनीष जैन यांनी अल्पसंख्याक समाजातील मुस्लिम, खिश्चन,पारसी, शीख व जैन यांच्या विकासाच्या योजनांची अंमलबजावणी दिरंगाईने होणे, त्यांना लोकसंख्येच्या प्रमाणात शाळा देण्यात न येणे, त्यांच्या वस्त्यांमध्ये मूलभूत सुविधांचा असलेला अभाव,त्यांचा मंजूर झालेला निधी व्यपगत होणे,भिवंडीत दंगलीत बाधित अल्पसंख्याकांना, लोकांना आश्वासन देऊनही घरे न मिळणे व वक्फ बोर्डाच्या मिळकतीच्या सर्वेक्षणाच्या निर्णयाची अंमलबजावणी न होणे,या विषयावर आजच्या कामकाजपत्रिकेवरील कामकाज स्थगित करण्यासाठी नियम २८९ अन्वये सूचना दिलेली आहे. याबाबतीत सन्माननीय सदस्यांना आपले म्हणणे मांडावयाचे असल्यास, त्यांनी थोडक्यात म्हणणे मांडावे. त्यानंतर मी या सूचनेवरील माझा निर्णय देईन.
श्री. मनीष जैन : सभापती महोदय, अल्संख्याकांमध्ये मुस्लिम,खिश्चन,पारसी,शीख व जैन आहेत.या समाजाला मागील काळामध्ये शासनाने अल्पसंख्याक म्हणून घोषित केलेले आहे. शासनाने याला मंजुरी दिलेली आहे. या संदर्भातील अधिसूचना ऑक्टोबर, २००० मध्ये निर्गमित झाली आहे.तरी देखील या निर्णयाची अंमलबजावणी होत नाही, त्यामुळे शासनाच्या ज्या योजना आहेत त्या योजनांचा या अल्पसंख्याक समाजातील, या घटकांना फायदा मिळत नाही. या घटकांच्या मुलांना शाळेतील स्कॉलरशिपच्या फायद्यापासून वंचित रहावे लागते. शाळेमध्ये कोणतीही शैक्षणिक सवलत मिळत नाही. मुस्लिम समाजातील विद्यार्थ्यांना मदरसामध्ये शिक्षण घेण्यासाठी
२०/१८
जावे लागते. त्यामुळे ते चांगल्या दर्जाचे शिक्षण घेऊ शकत नाहीत. या अल्पसंख्याक समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणण्यासाठी शासनाने या अधिसूचनेची परिणामकारक अंमलबजावणी करावी. शासनाने या संदर्भातील कायदा मंजूर केलेला असताना त्याची अंमलबजावणी होण्यासाठी दिरंगाई का होत आहे,मुस्लिम, ख्रिश्चन, पारसी, शीख व जैन आहेत,या समाजाला अल्पसंख्याक समाजाचा दर्जा दिलेला आहे आणि तो या समाजाचा हक्क आहे. त्याची पूर्तता शासनाने लवकरात लवकर करावी व त्यासाठी योग्य ती पावले उचलावीत, अशी विनंती करतो.
उपसभापती : नियम स्थगित करण्याच्या संदर्भात मे. कौल आणि शकधर यांच्या "प्रॅक्टिस अँण्ड प्रोसिजर ऑफ पार्लमेन्ट" या ग्रंथात नमूद केल्याप्रमाणे कामकाज स्थगित करण्यासाठी दिवसाच्या कामकाजाच्या क्रमांत एखादा विशिष्ट असा प्रस्ताव सभागृहासमोर असणे आवश्यक आहे, तरच तो विचारात घेण्यासाठी कामकाज स्थगित करण्यासंबंधात विचार करता येईल. सन्माननीय सदस्य श्री.मनीष जैन यांनी नियम २८९ अन्वये उपस्थित केलेल्या विषयासंदर्भात आजच्या दिवसाच्या कामकाजपत्रिकेवर समाविष्ट असलेल्या कोणत्याही बाबींसंबंधात सर्व कामकाज स्थगित करण्याबाबात प्रस्तुत सूचनेद्वारे सन्माननीय सदस्यांनी दिलेला प्रस्ताव समाविष्ट नाही. त्यामुळे नियम २८९ च्या उपरोक्त सूचनेस मी अनुमती नाकारीत आहे. तथापि,अल्पसंख्याकांच्या विकासाच्या दृष्टीने सन्माननीय सदस्यांना हा विषय अन्य मार्गाने उपस्थित करून चर्चा करता येईल.