श्री. गिरीष बापट : अध्यक्ष महोदय, काल सभागृहाची बैठक संपताना माननीय पीठासीन अधिकारी यांनी आजची बैठक सकाळी ११.०० वाजता भरेल, असे जाहीर केले होते. यासंदर्भातील कार्यवृत्तातील नोंद आम्ही पाहिली आहे. परंतु, आजची बैठक सकाळी ११.०० वाजता सुरूझाली आहे. कामकाज सल्लागार समितीमध्ये काय ठरले, हा भाग वेगळा आहे. कारण, शेवटीसभागृह सार्वभौम आहे व कामकाज सल्लागार समितीमधील निर्णय सभागृह ओव्हर-रुल करू शकते.अशाप्रकारे अचानक सभागृहाच्या बैठकीची वेळ बदलल्यामुळे सन्माननीय सदस्यांना असुविधा होते. त्यामुळेच अनेक माननीय मंत्री व सन्माननीय सदस्य सभागृहात आज पोहोचू शकलेले नाहीत. प्रश्नोत्तराचा तास महत्त्वाचा असतो. विरोधी पक्षाने सहकार्य केले पाहिजे, हे आम्हाला मान्य आहे व
त्याप्रमाणे सहकार्य करण्याचीच आमची भूमिका आहे. परंतु, सभागृहात चुकीच्या प्रथा पडू नये म्हणून काल माननीय पीठसीन अधिकार्यांनी सभागृहात जाहीर केल्याप्रमाणे सभागृहाची बैठक सकाळी ११.०० वाजता सुरू करावी, अशी माझी विनंती आहे.
अध्यक्ष : ठीक आहे. सभागृहाची बैठक मी आता स्थगित करीत आहे. सभागृहाची नियमित बैठक सकाळी ११.०० वाजता पुन: भरेल.
(सभागृहाची बैठक सकाळी १० वाजून १ मिनिटांनी सकाळी ११.०० वाजेपर्यंत स्थगित झाली.)