( सन्माननीय सदस्य श्री. विवेक पंडित वेलमध्ये येऊन बसतात.)
श्री. गिरीष बापट : अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री. विवेक पंडित वेलमध्ये येऊन बसलेले आहेत. त्यांचे दु:ख असे आहे की, माननीय मुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये त्यांना वसई-विरार महानगरपालिकेतून ३५ गावे वगळण्याचे आश्वासन दिले होते. परंतु अद्याप त्या आश्वासनाची पूर्तता झालेली नाही. म्हणून ते क्लेश व्यक्त करण्याकरिता आज विधान भवनाच्या पायर्यांवर उपोषणाला बसणार आहेत. म्हणून शासनाने यासंदर्भात आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी माझी विनंती आहे.
(विरोधी पक्षाचे काही सन्माननीय सदस्य वेलमध्ये येऊन बसतात.)
श्री. हर्षवर्धन पाटील : अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य श्री. विवेक पंडित यांचे निवेदन आपल्याला प्रापत झालेले आहे आणि त्या निवेदनाची एक प्रत मलासुद्धा मिळालेली आहे. सन्माननीय सदस्य श्री. विवेक पंडित आज सकाळी मला भेटले होते. माझी अशी विनंती आहे की, आपण प्रश्नोत्तराचा
तास पूर्ण करावा. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर या विषयावर चर्चा करता येईल.
उपाध्यक्ष : मी सन्माननीय सदस्यांना सांगू इच्छितो की, प्रश्नोत्तराचा तास झाल्यानंतर आपले म्हणणे ऐकून घेतले जाईल. सन्माननीय सदस्य श्री. आर. एम. वाणीसाहेब, आपण सर्वांनी मघाशी छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेतलेले आहे. सन्माननीय सदस्य श्री. विवेक पंडितसाहेब, आपण अजून थोडे
विवेकाने वागलात तर अधिक चांगले होईल. सन्माननीय सदस्यांनी कृपया आपल्या जागेवर बसावे. सन्माननीय सदस्यांच्या भावनांची दखल घेतली जाईल. आता आपण प्रश्नोत्तराचा तास सुरू करू.
श्री. एकनाथराव गणपतराव खडसे पाटील : अध्यक्ष महोदय, माननीय मुख्यमंत्र्यांनी सभागृहात आश्वासन दिलेले आहे की, वसई-विरार महानगरपालिकेतून ३५ गावे वगळण्यात येतील. सन्माननीय सदस्य श्री. विवेक पंडित यांनी यासंदर्भात वारंवार आग्रह धरला, मागील अधिवेशनामध्ये उपोषण केले,
मोर्चा काढला, पायी चालत आले. परंतु शासनाने त्यांना जे आश्वासन दिले होते त्याची अद्याप पूर्तता झालेली नाही. मग त्यांच्याकडे दुसरा मार्ग काय आहे ? सभागृहामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी यासंदर्भात आश्वासन दिलेले आहे. माननीय मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या आश्वासनाची पूर्तता व्हावी म्हणून त्यांनी अनेक वेळा शांततामय मार्गाने आंदोलन केलेले आहे. माझी विनंती आहे की, प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर किंवा आज दिवसभरामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी किंवा संबंधित मंत्रिमहोदयांनी यासंदर्भात सभागृहात खुलासा करून त्यांना आश्वासन दिले पाहिजे की, आम्ही या कालावधीत ही कार्यवाही पूर्ण करू.
उपाध्यक्ष : प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर मी माननीय मुख्यमंत्री आणि माननीय उपमुख्यमंत्री महोदयांना विनंती करीन आणि ते यासंदर्भात खुलासा करतील. आता सन्माननीय सदस्यांनी कृपया आपल्या जागेवर बसावे.